लोकसभा निवडणुकीविषयी ‘या’ सुपरस्टारने केली मोठी घोषणा

चेन्नई : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येणार याबद्दल सगळ्यांचाच उत्सुकता होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीतून रजनीकांत यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतली आहे. रजनीकांत यांच्यासह त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंदारमचाही निवडणुकीत सहभाग नसेल. अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्धीपत्रक काढूनच तशी घोषणा केली आहे.

रजनीकांत यांनी म्हटले की, ‘आपला पक्ष कोणत्याही इतर पक्षाला पाठिंबा किंवा मदत करणार नाही. यामुळे कोणीही आपल्या पक्षाचा झेंडा, फोटो किंवा अन्य तपशील वापरू नये. तसेच रजनी मक्कल मंद्रम किंवा रजनी फॅन क्लब अशी नावेही वापरू नयेत. तसेच तामिळनाडूला पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. यामुळे जो पक्ष त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवेल त्याला लोकांचा पाठिंबा मिळेल.’

अभिनेते कमल हसन यांनी राजकारणात येत नवीन पक्षाची स्थापना केली. त्यानंतर अभिनेते रजनीकांत यांनी ३१ डिसेंबर २०१७ रोजी पक्षाच्या नावाची घोषणा करत, राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतला. ‘रजनी मक्कल मन्दरम’ असे रजनीकांत यांच्या पक्षाचे नाव आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीत तामिळनाडूत ‘स्टार वॉर’ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रजनीकांत यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.