Thane News : जावई निघाला हरामखोर ! सासर्‍याचा खून करून मृतदेह फेकला रेल्वेच्या रूळांवर

कर्जत, ता. २ : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य रेल्वेवरील कर्जत आणि भिवपुरी दरम्यान १७ मार्च रोजी रेल्वे रुळांवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला होता. ही हत्या असल्याचे उघड झाल्यानंतर कर्जत रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, सासऱ्याची हत्या करून त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर फेकणाऱ्या आरोपी जावयाला ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रेल्वे पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. कर्जत आणि भिवपुरी दरम्यान रेल्वे रुळांवर मृतदेह फेकला होता. पोलीस हत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत.

मृताची ओळख पटवण्याचे आव्हान तपासादरम्यान रेल्वे पोलिसांसमोर होते. रवी पवार (वय ४५) असे मृताचे नाव असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपास केला असता, अमरावती जिल्ह्यातील माणगाव येथील व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेत पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. १६ मार्च रोजी पवार हे आपल्या जावयासोबत घराबाहेर पडल्याची माहिती त्यांना मिळाली. कुटुंबीयांनी सांगितले की, ते ज्या दिवशी घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून जावई शैलेश भोसले याला मंगळवारी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. सासऱ्याची हत्या का केली, यामागील कारणांचा शोध पोलिस घेत आहेत.