साडेसतरा कोटींच्या घोटाळा करणाऱ्या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन फेटाळला

ADV
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – हॉस्पिटल मधील वैद्यकीय मशिनरीच्या नावाखाली शहर सहकारी बँकेतून साडेसतरा कोटी रुपयांचे कर्ज काढून प्रत्यक्षात मशिनरीची खरेदी न करता आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. नावंदर यांनी हा आदेश दिला.
जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ. शेळके याला 7 नोव्हेंबर 2018 रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाल्यावर सरकारी पक्षाच्यावतीने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची जोरदार मागणी केली होती. न्या. नावंदर यांच्यासमोर सदर अर्जावर सुनावणी झाली. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने व सखोल तपास करणे आवश्यक असल्याने आरोपी शेळके याचा जामीन अर्ज फेटाळून लावण्याची मागणी न्यायालयात केली होती. न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे ग्राह्य धरूव आज डॉ. शेळके याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
 
काय आहे प्रकरण
डॉ. निलेश शेळके याने शहर सहकारी बँकेचे चेअरमन, व्हा-चेअरमन, संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, मशिनरी डीलर, ‘सीए’ला हाताशी धरून ‘एम्स’ हॉस्पिटलसाठी वैद्यकीय मशिनरी खरेदीसाठी साडेसतरा कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. प्रत्यक्षात त्या मशिनरी खरेदी केल्याच नाहीत. बँकेने मंजूर कर्जाची रक्कम धनादेशाद्वारे मशिनरी डीलरला दिली. मशिनरीची खरेदी न झाल्यामुळे मशिनरी डीलरने सदर रक्कम डॉक्टर शेळकेने उघडलेल्या तीन डॉक्टरांच्या वेगवेगळ्या बनावट खात्यावर ट्रान्सफर केले. ही रक्कम परस्पर स्वतःकडे घेतली. या रकमेचा डॉ. शेळके याने अपहार केला.

बँकेच्या संचालक मंडळाला हाताशी धरून शेळके याने साडेसतरा कोटी रुपयांचे बोगस कर्ज आमच्या नावे उचलले, अशी तक्रार डॉ. उज्वला कवडे, डॉ. रोहिणी सिनारे, डॉ. श्रीखंडे यांनी पोलिसांत दिली होती. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून तीनही डॉक्टरांच्या फिर्यादी नोंदविल्या. या तीन डॉक्टरांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात बनावट दस्तऐवज तयार करून कर्ज काढून रकमेचा अपहार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पोलीस उपाधीक्षक प्रांजल सोनवणे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. डॉ. शेळके हा या गुन्ह्यात मुख्य आरोपी आहे.