आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, ४२ जवान शहीद

जम्मू : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे आज दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४२ जवान शहीद झाले आहे. या घटनेत शहीद जवानांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकीस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये झालेल्या उरी हल्ल्यानंतरचा सर्वात मोठा हल्ला आज करण्यात आला आहे. या घटनेमुळे दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.

जम्मू काश्मीरचे राज्यपाल मलीक यांनी सुरक्षेत गंभीर चूक झाल्यामुळे हा हल्ला झाला असल्याचे म्हटले आहे. या परिसरात सर्च ऑप्रेशन सुरु करण्यात आले आहे.

सीआरपीएफचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना अवंतीपुरातील गोरीपोरा येथे या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं. ताफ्यात ७० वाहनं होती तर २ हजार ५०० जवान व अधिकारी होते. या ताफ्यात स्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवून हा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटानंतर गोळीबार करण्यात आला. पुलवामा हल्ल्यावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.

सर्व जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला असून घटनास्थळाची पाहणी करण्यात आल्याचे सीआरपीएफचे महानिरीक्षक (ऑपरेशन्स) झुल्फिकार हसन यांनी सांगितले.

जैश-ए-मोहम्मदने व्हायरल केला स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्याचा फोटो
जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यामागील सुत्रधार दहशतवाद्याचे छायाचित्र जारी करण्यात आले आहे. आदिल अहमद असे याचे नाव असून त्याच्या छायाचित्रावर जैश-ए-मोहम्मद लिहिण्यात आले आहे.