मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आज राळेगणसिद्धीत येणार

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. अण्णांची प्रकृती खालावत चालल्यामुळे सरकारने आता त्यांचे आंदोलन गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री व अधिकाऱ्यांचा ताफा आज राळेगणसिद्धीत दाखल होणार आहे. ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेत आजपासून चूलबंद आंदोलन सुरू करून अण्णांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
लोकपाल व लोकायुक्त यांची नियुक्ती, शेतमालाला रास्त भाव आदी मागण्यासाठी अण्णांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे सुरुवातीचे काही दिवस कोणीही प्रशासकीय अधिकारी व राज्य शासनाचा प्रतिनिधी फिरकला नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सलग दोन दिवस राळेगणसिद्धीत आले व अण्णांशी चर्चा केली. मात्र त्यांच्या आश्वासनावर अण्णांचे समाधान झाले नाही. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याशी चर्चा अर्ध्यावरच सोडून अण्णा ग्रामसभेत गेले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मंत्री राळेगणसिद्धीत होते. मात्र कोणत्याही प्रकारचा तोडगा सरकार काढू शकले नाही. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत चर्चा करायलाही येऊ नका, अशी ठाम भूमिका आण्णांनी घेतली आहे.
आठ फेब्रुवारी रोजी सरकारच्या निर्णयाची वाट पाहिल, अन्यथा केंद्र सरकारने दिलेला पद्मभूषण पुरस्कार परत देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. अण्णांची प्रकृती वयोमानामुळे चांगलीच खालावलेली आहे. ग्रामस्थ त्यांच्या प्रकृतीची काळजी करीत आहे. रात्री दोन्ही मंत्री उशिरापर्यंत राळेगणसिद्धीत ठाण मांडून होते. अण्णांच्या आक्रमक पवित्र्यामुळे रात्री अनेक घडामोडी घडल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व इतर अधिकारी आज राळेगणसिद्धीत येणार आहेत. त्यानंतर सर्वजण अण्णांशी चर्चा करणार आहेत. अण्णांच्या मागण्या मान्य करून त्यांना उपोषण सोडण्यास परावृत्त करण्याचा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. अनेक व्हीआयपी राळेगणसिद्धीत येणार असल्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने राळेगणसिद्धीत पोलीस बंदोबस्तात वाढ केली आहे.