सेल्फीच्या नादात विवाहितेचा दरीत कोसळून मृत्यू

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन

सेल्फी घेण्याच्या नादात सुरक्षिततेकडे केलेले दुर्लक्ष कसे जीवावर बेतू शकते, याचं आणखी एक उदाहरण समोर आले आहे. माथेरानमध्ये सेल्फी काढताना दरीत कोसळून ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

दिल्लीत राहणा-या ३५ वर्षीय सरिता चौहान मंगळवारी आपल्या पती आणि मुलांसोबत माथेरानला फिरायला आल्या होत्या. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सरिता कुटुंबासोबत लुईसा पॉईंटवर फिरायला गेल्या होत्या.

लुईसा पॉईंटवर सुमारे ६०० फूट खोल दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सरिता आणि त्यांचा पती सेल्फी काढण्यासाठी गेले होते. याचवेळी आलेल्या जोराच्या वा-यामुळे सरिता यांचा तोल गेला आणि त्या दरीत कोसळल्या.

या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माथेरानमधील बचाव पथक आणि स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर आज सकाळी सरिता यांचा मृतदेहच सापडला.