भाजप आमदाराच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून दुसऱ्या पत्नीवर अट्रॉसिटीचा गुन्हा

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – आर्णी केळापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदाराच्या दुसऱ्या पत्नीविरोधात पांढरकवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात आमदाराची पहिली पत्नीच तक्रारदार आहे.

भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया शिंदे यांच्या विरोधात पहिल्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार अट्रॉसिटी, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे आर्णी-केळापूर मतदारसंघाचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांच्या कुटुंबात मागील काही दिवसांपासून कलह सुरु आहेत. दोन पत्नी एकमेकांविरोधात उभ्या राहिल्या असून फेब्रुवारीमध्ये त्यांच्या पहिल्या पत्नी व कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पत्नीला भररस्त्यात मारहाण केली होती. त्यावरून दुसऱ्या पत्नीने यवतमाळच्या पोलीस अधिक्षकांकडे यासंदर्भात धाव घेतली होती. त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. त्यावर कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यानंतर आता दुसऱ्या पत्नीविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.