ईपीएफच्या लाचखोर सहआयुक्ताला सीबीआयकडून (CBI) अटक

पणजी : वृत्तसंस्था – कामगार संबंधी नियमांचे उल्लंघनाबद्दल कारवाई टाळाण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्याच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्त रवींद्रनाथ रॉय याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सीबीआयच्या गोवा भ्रष्टाचार विरोधी विभाग विभागाकडून सोमवारी सकाळी करण्यात आली. सकाळी १०च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सरु होती.

संशयित रवींद्रनाथ याच्या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरु आहे. तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रॉय याच्या निवासस्थानीही छापा टाकण्यात येणार आहे. या कारवाईदरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांना काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असून त्यांनी ती जप्त केली आहेत.

समीर महाले या कंत्राटी कामगार पुरविणाऱ्या व्यक्तीकडून रवींद्रनाथच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार नोंदविली होती. महाले यांच्यावर भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाच्या कार्यालयातून कर्मचारी नियम उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कारवाई व्हायला नको असेल तर लाच देऊन मोकळा हो, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. ही लाच लाखात होती परंतु निश्चित रक्कम सीबीआयकडून जाहीर करण्यात आली नाही. महाले यांनी ही गोष्ट सीबीआयला कळविल्यानंमतर सीबीआयकडून व्यवस्थितपणे सापळा रचून कारवाई केली आणि रवींद्रनाथ याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यास यश मिळविले.

या दरम्यान रवींद्रनाथ व तक्रारदार यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग सीबीआयकडून करण्यात आले आहे. तसेच पैसे घेतल्याचे पुरावे म्हणून त्याच्या ठशेही घेण्यात आले आहेत. शिवाय दोघांत झालेले फोनवरील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यामुळे रॉय याच्या अडचणी वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी याच खात्याच्या आणखी एका अधिकाऱ्याला लाचखोरी करताना सीबीआयने पकडले होते.