थेट पाईपलाईनच्या पैशांवर माजी गृह राज्यमंत्र्यांचा दरोडा

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – थेट पाईपलाईनच्या पैशांवर माजी गृहराज्यमंत्री यांनी दरोडा टाकला आहे. असा रोखठोक आरोप महापालिकेतील ताराराणी आघाडीच्या गटनेत्या सत्यजित कदम,भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक सुनील कदम, अजित ठाणेकर, किराणा नखाते, आशिष ढवळे यांनी एका प्रसिद्धिपत्रकादवारे केली आहे.

या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, ” माजी गृह राज्यमंत्र्यांनी गाजावाजा करून योजनेच्या कामाचे उद्घाटन केले; पण गेल्या पाच वर्षांत चुकीच्या पद्धतीने झालेल्या कामाची सुरुवातच योजना रखडण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे श्रेयासाठीचा प्रयत्न उघडा पडला आहे. त्यामुळेच सतेज पाटील  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत.

वास्तविक, योजना मंजूर करून घेताना अत्यंत घाई, गडबडीत स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी कोणत्याही विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता अपुरी व अर्धवट पूर्तता करून मंजूर केली. योजना रखडण्यास ठेकेदार व सल्लागार सर्वस्वी जबाबदार आहेत. ठेकेदार कंपनीने कामाची सुरुवात शासन मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे न करता उलट्या क्रमाने केली आहे. आजपर्यंत योजनेवर ३९१ कोटी खर्च झाला आहे. त्यामुळे योजना थांबविता येणे शक्य नाही. परिणामी, योजनेतील त्रुटी, वाढीव किमती आणि व्यवहार्यतेचा पूर्ण अभ्यास करून निविदेची पुनर्मांडणी करणे आवश्यक आहे. त्यातून किमान ५० कोटींची बचत होऊ शकते, असेही या पत्रकात म्हटले आहे.