नवविवाहित दाम्पत्याची चोरून शूटिंग करणारा गजाआड

बेळगाव वृत्तसंस्था

येथील पिरनवाडी मध्ये भाडोत्री राहायला आलेल्या नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोची रात्रीच्या वेळी खिडकीमधून चोरून व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या आंबट शौकिनास पोलिसांनी गजाआड केले आहे. सलग पाच दिवस रात्रीच्या वेळी खिडकीतून तो शूटिंग करत होता.

सुनील वाडकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित दाम्पत्याने येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पिरनवाडी येथे एक नवविवाहित दाम्पत्य भाडोत्री घर घेऊन राहत होते. त्यांच्या शेजारच्या घरात राहणारा तरुण दररोज नवविवाहित दाम्पत्य घरात असताना खिडकीतून चोरून शुटिंग करायचा. सतत पाच दिवस रात्रीच्यावेळी त्याने नवविवाहित दाम्पत्याची शूटिंग केली होती. सहाव्या दिवशी तो शूटिंग करताना नवविवाहित दाम्पत्याला आढळून आला. शूटिंग करत असल्याची गोष्ट लक्षात येताच नवविवाहित दाम्पत्याने या संबंधी ग्रामीण पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब तपास करत आरोपीस बेड्या ठोकल्या.