पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी विशाल तांबे, दत्ता धनकवडे यांची नावे अग्रक्रमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षपदी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे – पाटील यांची निवड जवळपास निश्चित मानली जात असून पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नगरसेसवक विशाल तांबे आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यापैकी एका नावावर आज (गुरुवार) दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.

चेतन तुपे – पाटील हे उच्च शिक्षित असून हडपसर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादीच्या सत्ता काळात शहर सुधारणा समितीच्या माध्यमातून जुन्या शहराचा विकास आराखडा करण्यामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते. मागील विधानसभा निवडणुकी मध्ये त्यांना पक्षाने हडपसर विधानसभा मतदार संघातून संधी दिली होती. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणूकी मध्ये पक्षाची पिछेहाट झाली असताना पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल निवडून आले आहे. माजी महापौर चंचला कोद्रे यांच्या निधनामुळे झालेल्या पोट निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणण्यात  पाटील यांची भुमिका महत्वाची ठरली आहे. पालिकेचे विरोधी पक्षनेते पद भूषविताना पाटील हे सत्ताधारी भाजपला विविध प्रश्नांवर जेरीस आणत आहेत. त्यांच्या या अभ्यासू वृत्ती आणि संवाद कौशल्यामुळे विरोधात असतानाही राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यापेक्षा सरस ठरत आहे.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2844fec-7a81-11e8-8ed5-b1a384f63702′]

आगामी विधानसभा निवडणुकी मध्ये हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते अजित पवार यांनी संभाव्य उमेदवार आणि पदाधिकारी निवडण्याची सुत्रे स्वतःकडे घेतली आहेत. सुरवातीला शहर अध्यक्ष पदासाठी माजी उपमहापौर दिपक मानकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. परंतु जागेच्या वादातून एकाने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात मानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यांच्या पाठोपाठ माजी महापौर प्रशांत जगताप यांच्याही नावाची चर्चा होती, परंतू आता त्यांचे देखील नाव मागे पडले असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर चेतन तुपे – पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खासदार ऍड. वंदना चव्हाण या गेली आठ वर्षे पक्षाच्या शहर अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. पक्षाच्या वतीने त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शहर अध्यक्षपदी नवीन चेहऱ्याला संधी देण्याची घोषणा पक्षाचे नेते अजित पवार यांनी तीन महिन्यांपुर्वी केली होती.

विरोधी पक्षनेतेपदी विशाल तांबे किंवा दत्तात्रय धनकवडे ?

पालिकेतील सत्तेला सव्वा वर्ष झाल्याने भाजप मधून महापौर, उपमहापौर बदलून नव्यांना संधी देण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर चेतन तुपे – पाटील यांची शहर अध्यक्षपदी निवड करून पालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी नवीन चेहेऱ्याला संधी देण्याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक असून दिपक मानकर, प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, दिलीप बराटे, विशाल तांबे, चेतन तुपे – पाटील, सचिन दोडके ही ज्येष्ठ नगरसेवकांची फळी अधिक आक्रमक आहे. मानकर आणि जगताप यांची नावे मागे पडले असून ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी मोहोळ मतदार संघातून तयारी सुरू केल्याने ते शहर अध्यक्ष पदाच्या चर्चेतून मागे पडले आहेत.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cd4a5299-7a81-11e8-a13b-43968cda9c38′]

चेतन तुपे- पाटील यांचे नाव शहर अध्यक्ष पदासाठी पुढे आल्याने माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आणि माजी महापौर दत्ता धनकवडे ही खडकवासला मतदार संघातील दोन नावे पुढे आली आहेत. खडकवासला मतदार संघ बारामती लोकसभा मतदार संघात येत असून खासदार सुप्रिया सुळे या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. अशातच दत्ता धनकवडे आणि सचिन दोडके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी खडकवासला मतदार संघातून जोरदार तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेतील विरोधी पक्षनेते पदाची माळ विशाल तांबे अथवा दत्ता धनकवडे यांच्या गळ्यात पडेल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.