कर्नाटकात ‘पिक्चर अभी बाकी है – मल्लिकार्जुन खरगे

बेंगळूरू: वृत्तसंस्था

काॅंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी कर्नाटकात पिक्चर अभी बाकी है अशाप्रकारचे विधान केल्यामुळे काही कालावधी पुरता का होईना शांत झालेला कर्नाटकचा राजकिय फड पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. खरगे यांच्या विधानामुळे कर्नाटकच्या राजकिय क्षेत्रात नवीन मोड येतो आहे का याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. सुरूवातीपासून कर्नाटकच्या राजकिय आखाड्यात वेगवेगळे डाव पडताना दिसत होते. कोण प्रत्यक्षात बाजी मारेल याचा काही अचूक अंदाज बांधता येत नव्हता. अशा परिस्थितीत तीन दिवसांच्या येडियुरप्पा सरकारने राजीनामा दिल्यानंतर सर्वांना असे वाटले होते की आता तरी कर्नाटकातील नाटक काही काळापुरते का होईना थांबेल. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जरा वेगळीच निर्माण होवू पाहते आहे.

निवडणुकीच्या कालावधीत एकमेकांवर जहरी टीका करणारे हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेचा गाडा व्यवस्थित हाकतील काय अशा अनेकांना शंका निर्माण होत आहेत. त्यात आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या विधानामुळे एकूणच कर्नाटकातील राजकीय घडामोडी इतक्यात शांत होतील असे वाटत नाही. खर्गे म्हणाले, राज्यातील सरकार कसे असेल याबाबतचा निर्णय हायकमांड घेईल. आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आणि जेडीएस एक प्रादेशिक पक्ष आहे. त्यामुळेच सर्व बाबींचा विचार करून गोष्टी ठरवल्या जातील आणि त्यानुसारच काँग्रेसला सत्तेत वाटा मिळेल.

भाजपाचे सरकार कर्नाटकात कोसळल्यानंतर जेडीएसचे कुमारस्वामी यांचा शपथविधी होणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र ज्या काॅग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर जेडीएस सत्तेत येणार आहे. त्याच्यासोबतच अनेक गोष्टीवर एकमत झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. जेडीएस-काँग्रेस सरकारमध्ये कोणत्या पक्षाचे किती मंत्री असतील, तसेच कोणते मंत्रालय कोणाकडे असेल याबाबत अद्याप विचार झालेले नाही. केवळ एकच गोष्ट निश्चित मानली जात आहे ती म्हणजे कुमारस्वामी मुख्यमंत्री होतील.

त्या अगोदर कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सांगितले होते की, ते 24 तासात बहुमत सिद्ध करुन दाखतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुमारस्वामी सोमवारी दिल्लीमध्ये दाखल होणार असून, सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. तसेच जेडीएसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जेडीएस सरकार 21 मे ऐवजी 23 मे रोजी शपथ घेईल. या कार्यक्रमास तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींसह अन्य विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत.

संबंधित घडामोडी:

कर्नाटकात काँग्रेस,जेडीयुची खरी परिक्षा
येडियुरप्पा घेणार उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ
बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
कर्नाटकात उद्याच बहुमत चाचणी घ्या : सुप्रीम कोर्ट
कर्नाटक : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडे २८ तास
कर्नाटक : मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
राजीनामा तरीही, येडियुरप्पांची ‘रेकॉर्ड’ ब्रेक कामगिरी
येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाले शरद पवार
सोशल मीडियावर येडियुरप्पा आणि भाजपच्या जोक्सचा धुमाकूळ
कुमारस्वामी होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान