शेतकऱ्यांनो सतर्क व्हा… ! विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसासह गारपीटीची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे येत्या २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान येथील काही भागात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यात अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे

शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी

या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.