वाळूचे जप्त ट्रक पोलीस ठाण्यातून पळविले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन

जप्त केलेले दोन वाळूचे ट्रकच पोलीस ठाण्याच्या आवारातून चोरून नेल्याची घटना दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्यात घडली. यामुळे पोलीसांना देखील चोरटे जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. चोरी आणि इतर गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची दमछाक होत असतानाच हा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’28822b0e-a9c9-11e8-a35f-ed639ddcced8′]

आत्तापर्यंत महसूल विभागाच्या ताब्यात असलेल्या गौण खनिजाच्या ट्रकची चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु, आता पोलिसांच्या रखवालीतून ट्रकच्या चोरी झाल्याने चोरांना आता पोलिसांचेही भय राहिले नसल्याचे दिसून येत आहे. चोरीस गेलेल्या वाळूची व दोन्ही ट्रकची किंमत १० लाख १८ हजार रुपये एवढी आहे. या चोरीप्रकरणी पोलीस शिपाई हेमंत अशोकराव कुंजीर यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, यवत पोलिसांनी बापू माणिक मदने ( रा. भिमनगर, दौंड), संदीप कोंडीबा झिटे (रा. गिरीम, ता. दौंड) तर तुळशीराम कोंडीबा मोटे, सुनील हिरामण पवार (दोघे रा. गिरीम, ता. दौंड) या चौघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक देवकर करीत आहेत.

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव हे पथकासह पुणे-सोलापूर महामार्गावर रात्रीची गस्त घालत असताना त्यांना वाळूचे अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक (क्र. एमएच १२ ईएफ ४७८५ व एमएच १२ सीके ९७४५) आढळून आले. दोन्ही  ट्रकच्या चालकांकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नव्हता. त्यामुळे दोन्ही ट्रक पोलिसांनी जप्त करून यवत पोलीस ठाण्याच्या पाठीमागील मोकळ्या आवारात लावले होते. हे दोन्ही ट्रक आरोपींनी पोलिसांची नजर चुकवून चोरून नेले. या दोन्ही ट्रकमध्ये सहा ब्रास वाळू होती.