विक्रेत्याची हत्या, मुलगाही गंभीर जखमी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून भाजीविक्रेत्या पितापुत्रावर पाच जणांच्या टोळक्याने अरिंगळे मळा येथे धारदार हत्याराने वार केले. ही घटना स्वा. सावरकर उड्डाणपुल येथे घडली. या हल्ल्यात नरसिंग गोपीनाथ शिंदे (५०, रा. एकलहरा रोड, अरिंगळे मळा, श्रीकृष्णनगर) यांचा पोटात चाकू भोसकल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मुलगा संदीप नरसिंग शिंदे हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारुती नरसिंग शिंदे (१७) याच्या फिर्यादीवरून पाच संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित दीपक शंकर पाडळे, सुरेश उर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे, आकाश शंकर पाडळे, अमोल शंकर पाडळे यांना ताब्यात घेतले. यातील पाचवा संशयित अल्पवयीन आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मारुती शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचे वडील उड्डाणपुलाखाली हातगाड्यावर उसळ विक्रीचा व्यवसाय करतात, तर भाऊ संदीपदेखील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उसळ विक्रीचाच व्यवसाय करतो.

त्याच्या वडिलांनी माल वाहतुकीसाठी आपल्याकडील फोर्ड फिगो ही गाडी घरी घेऊन जाण्यासाठी दुकानाजवळ आणली होती. दुकानासमोरच संशयित दीपक शंकर पाडळे (रा. पाण्याची टाकी, अश्विनीनगर, नाशिकरोड) याची दुचाकी उभी केलेली होती. ती बाजूला करण्यास मारुती गेला असता, संशयित दीपकने, गाडीला हात लावू नकोस, तू बादशाह झालास का, गाडी कोणाची आहे, माहीत नाही का, असे म्हणत शिवीगाळ करून मारहाण केली. याच वेळी त्याचे वडील नरसिंग शिंदे हे दीपकला समजावण्यास गेले असता, तेथे भाजी विक्री करीत असलेली दीपक पाडळेची आजी मीराबाई हिने तेथे येऊन नरसिंग शिंदेंना शिवीगाळ केली. यावरून शिंदे व संशयिताची झटापट झाली. उपस्थितांनी मध्यस्थी करीत ही झटापट सोडविली.

त्यानंतर ते मुलगा मारुतीसह निघून आलो. ही सर्व हकीकत, बाहेर गेलेला मारुतीचा भाऊ संदीपला फोनवरून सांगितली. रात्री सव्वादहा वाजता ते घरी बसलेले असताना, संदीप का येत नाही, हे पाहण्यासाठी नरसिंग हे घराबाहेर गेले. त्याचवेळी त्यांचा ओरडण्याचा मोठा आवाज आला. मारुती व त्याची आई घराबाहेर गेले असता, संशयित दीपक शंकर पाडळे, सुरेश उर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे, आकाश शंकर पाडळे, अमोल शंकर पाडळे, पिंट्या सोनवणेचा अल्पवयीन मुलगा हे सर्व संशयित मारुतीचा भाऊ संदीप आणि नरसिंग यांना धारदार हत्याराने वार करत होते.

नरसिंग यांना अमोल पाडळेने धरून ठेवले होते व पिंटू सोनवणेने त्याच्या हातातील चाकू नरसिंग यांच्या पोटात खुपसला. त्यानंतरही अल्पवयीन संशयित हा नरसिंग यांना हाताने मारतच होता, तर संदीप याला रस्त्याच्याच बाजूला गवतात पाडून दीपक पाडळे व आकाश पाडळे दांडक्याने मारत त्याच्यावर धारदार हत्याराने वार करीत होते. नरसिंग यांच्या पोटात चाकू भोसकताच मारुती व त्याची आई हे नरसिंग यांच्याकडे पळत गेले. त्यांच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. तेवढ्यात सर्व संशयित तेथून फरार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.