शासनाच्या प्रयत्नांना यश : दत्ता पडसलगीकर स्वीकारणार मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्याचे शासनाने जाहीर करुन तशी केंद्र सरकारला विनंतीही केली. ती मान्य झाल्यानंतर आदेश काढण्यात आला. परंतु, निवृत्तीला एक दिवस शिल्लक असतानाही अधिकृतपणे तसे पत्र न मिळाल्याने त्यांनी मुदतवाढ नाकारण्याचे ठरविले. तसे वृत्त झळकल्यानंतर गृह विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे मन वळविले. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी मुदतवाढ स्वीकारण्याचे निश्चित केले असून आज (शुक्रवारी) त्यांना अधिकृतपणे तसे पत्र दिले जाणार आहे.

राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या निवृत्तीच्या व मुदतवाढीच्या प्रश्नांवरुन सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. पोलीस महासंचालक हे निवृत्त होत असताना राज्यातील प्रमुख आयुक्तालयाला भेटी देतात. तेथे त्यांचा निरोपाचा समारंभ होत असतो. पण, सध्या सुरु असलेली अतिमहत्वाची प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावीत म्हणून राज्य शासनाने त्यांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला.

[amazon_link asins=’B01GPL6L96,B01L26OFVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20cbc0d7-accc-11e8-9460-815dd082b746′]

मात्र, निवृत्त होण्यास एक दिवस शिल्लक राहिला असतानाही त्यांच्या हातात मुदतवाढीचे पत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ नाकारण्याचा निर्णय घेतला होता. वेळेत मुदतवाढीचे पत्र मिळाले तरच ती स्वीकारु असे त्यांनी सांगितले होते.

दत्ता पडसळगीकर हे निवृत्ती स्वीकारणार असून मुदतवाढ नाकारणार असल्याचे वृत्त गुरुवारी सर्वत्र पसरले. त्यामुळे जर त्यांनी निवृत्ती स्वीकारली तर त्यांना निरोप देण्यासाठी समारंभाची तयारी नायगाव येथील पोलीस क्वॉर्टरमध्ये सुरु करण्यात आली. शासकीय सलामीची रंगीत तालीमही घेण्यात आली.

या वृत्तानंतर गृह विभागातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. त्यांनी महासंचालकांशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून मुदतवाढीचे पत्र आले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजून सही बाकी असून शुक्रवारी दुपारपर्यंत मुदतवाढीचे पत्र दिले जाईल, असे त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी मुदतवाढ स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

सध्या देशभर गाजत असलेल्या नक्षलवाद्यांशी संबंधित अटक व पोलिसांवर होत असलेल्या आरोपाविषयी पोलिसांच्या वतीने महासंचालक दत्ता पडसलगीकर अथवा त्यांच्या वतीने एखादा वरिष्ठ अधिकारी आज (शुक्रवारी) दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.  त्यावेळी ते मुदतवाढ स्वीकारल्याचे अधिकृतपणे सांगण्याची शक्यता आहे.