‘ही’ मोठी स्पर्धा रद्द झाल्यानंतर IND-PAK सामन्याची प्रतीक्षा लांबणीवर

पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरु आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट स्पर्धा रद्द होणे किंवा स्थगित होण्याचे सत्र सुरुच आहे. कोरोनामुळे IPL चा यंदाचा मोसम स्थगित केला आहे. IPL चे उर्वरीत सामने यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर घेण्याचा BCCI चा मानस आहे. उर्वरीत सामने यूएईत होतील, अशा चर्चा सुरु असतानाच आता आणखी एक मोठी स्पर्धा रद्द करण्यात आली असून याचा सर्वात मोठा फटका भारत-पाकिस्तान या देशांतील चाहत्यांना बसला आहे.

कोरोनामुळे आशिया चषक ट्वेंटी-20 स्पर्धा रद्द केली आहे. जून महिन्यात श्रीलंकेत ही स्पर्धा होणार होती, परंतु श्रीलंकेत कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने तेथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीही कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द केली होती. गेल्यावर्षी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार होती. पण, ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कपच रद्द करावा लागला आणि त्यानंतर बीसीसीआयने त्या कालावधीत आयपीएलचे 13 वे पर्व युएईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ही स्पर्धा रद्द झाल्याचे अधिकृत वृत्त अद्याप आले नाही. पण, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कार्यकारी ॲश्ली डी सिल्व्हा यांनी यंदा ही स्पर्धा घेणे शक्य नाही, असे म्हटले आहे. 2023 च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ही स्पर्धा स्थगित केल्याचे संकेतही डी सिल्व्हा यांनी दिले. श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर वन डे मालिकेसाठी गेला आहे. जूलै महिन्यात श्रीलंका-भारत यांच्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. दरम्यान श्रीलंकेने बुधवारी (दि. 19) 10 दिवसांसाठी परदेशातून येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत