कमी कॅरेटचे दागिने देणाऱ्या सोनारांची चोरी उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आपण घेतलेला सोन्याचा दागिना हा नेमका किती कॅरेटचा आहे. ज्वेलर्स सांगतात ते नक्की खरे आहे का?, आपली फसवणूक तर होत नाही ना? अशा अनेक शंका नागरिकांना सोन्याचे दागिने घेताना असतात. पण, त्याची खात्री नेमकी कोठे करायची याची माहिती नसल्याने अनेक सोनारांचा कमी कॅरेटचे दागिने देऊन प्रत्यक्ष जादा कॅरेटचे असल्याचे दाखविण्याचा गोरख धंदा वर्षानुवर्षे सुरु आहे. त्यांची पोलखोल खडकीमधील युवक कार्यकर्ते अक्षय अनंत शिंदे यांनी उघड केली आहे.

त्यांच्या फिर्यादीनंतर खडकी पोलिसांनी मॉर्डन ज्वेलर्सचे निलेश शांतीलाल जैन आणि कमलेश शांतीलाल जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहर युवक काँग्रेस आणि खडकी कँट्रोंमेंट ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष शिंदे यांनी मॉर्डन ज्वेलर्स मधून आपल्या वडिलांसाठी सोन्याची अंगठी खरेदी केली होती. त्यावेळी सोनारांनी ती २३ कॅरेटची असल्याचे सांगितले होते. त्यांना शंका आल्याने त्यांनी ती दुसऱ्या सोनाराकडून तपासून घेतली तर ती प्रत्यक्षात २३ कॅरेट नव्हे तर १६़७१ कॅरेटची असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.