Coronavirus : देशात केरळ आणि महाराष्ट्रात 70 % अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आता देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. देशात केवळ 1.44 टक्के अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. देशात केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यामध्ये देशातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे या दोन राज्यात आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.

राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, देशात 20 कोटी तपासण्या करण्यात आल्या असून यामध्ये 1 कोटी 7 लाख पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्या देशात 1 लाख 60 हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून 1 लाख 54 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यात देशातील एकूण अ‍ॅक्टिव्ह केसेस पैकी 70 टक्के केसेस या राज्यात आहे. केरळमध्ये सध्या 68 हजार 365 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रात 38 हजार 762 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात 47 जिल्ह्यामध्ये मागील तीन आठवड्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर 251 जिल्ह्यामध्ये मागील तीन आठवड्यात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. देशाचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे, अशी माहिती राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत दिली.