धक्कादायक ! ‘कोरोना’ रुग्णांना नेण्यासाठी ॲम्बुलन्सच नाही, 12 तासांपासून 5 रुग्ण घरातच

गुहागर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून दररोज अनेक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. या रुग्णांना रुग्णालयात आणण्याचे काम रुग्णवाहिकांमार्फत करण्यात येते. मात्र गुहागरमध्ये प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे. सरकारी रुग्णवाहिका नादुरुस्त झाली असल्याचे कारण देत कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या पाच रुग्णांना घरातच आयसोलेट व्हा असे सांगण्यात आले आहे.

गुहागरमध्ये आज सकाळी पाच रुग्णांचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरातून कुठेही जाऊ नका, तुम्हाला न्यायला सरकारी रुग्णवाहिका येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्र झाली तरी गाडी आली नाही आणि त्यानंतर कोविड पॉझिटिव्ह असलेल्या नातेवाईकांची धावपळ सुरु झाली. दरम्यान, गाडी आज दुरुस्त होणार नाही, उद्या सकाळी होईल असे सांगत तुम्हाला घरातच आयसोलेट व्हावे लागेल असे सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्ण हे गुजरातमधील कुंभारवाडीतले आहेत. तर उर्वरित तीनजण गुहागर मोहल्ला येथील आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपासून कोणालाही संसर्ग होऊ नये त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु व्हावेत यासाठी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. मात्र, 12 तास उलटून गेले तरी रुग्ण घरातच आहेत. प्रशासनाने कोणतीच हालचाल न केल्यामुळे गुहागरमधील पाच रुग्णांना आजची (मंगळवार) रात्र घरातच काढण्याची वेळ आली आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की गाडी नाही म्हणून आज संशयित रुग्णांचे स्वॅब देखील घेतले गेले नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी दिली आहे.