पाणीकपातीची गरज पडणार नाही – खा.शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंढवा जॅकवेलच्या बेबी कालव्याच्या दुरुस्तीबरोबर टेमघर धरणाची दुरुस्ती देखील करावी आणि जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची सोय करावी असे केल्यास पुण्यात पाणीकपात करण्याची गरज पडणार नाही अशी सूचना खा.अनिल शिरोळे यांनी केली आहे.

पुण्यात पाणीकपात होणार नाही असे शिरोळे यांनी म्हटल असून माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी शिरोळे यांच्या सूचनेचे स्वागत केले आहे. पण, टेमघर धरणात पाणी आहे का? असा प्रश्नही केसकर यांनी उपस्थित केला आहे. पुण्याच्या पाणीपुरवठ्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी कालवा समितीची बैठक मुंबईत सोमवारी घेण्यात आली. बैठकीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. या बैठकीत चर्चेनंतर जलसंपदामंत्र्यांनी निर्णय राखीव ठेवला आहे.

समितीच्या बैठकीत पुण्याच्या पाणीकपितीबाबत शिरोळे यांनी अतिशय आक्रमक भूमिका मांडली असे समजते. यापूर्वी पाणीप्रश्नावर उपोषणाला बसण्याचा इशाराही शिरोळे यांनी दिला होता. पुण्याला दररोज १३५०एमएलडी पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटले आहे. पुण्याचा पाणीप्रश्न राजकीय पातळीवरही संवेदनशील बनला असून कालवा समितीच्या बैठकीत आठही आमदार गप्प बसतात. त्यांनी बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा राजिनामे द्यावेत अशी स्पष्ट मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी यापूर्वीच केली आहे.