निर्भया प्रकरणापुर्वी भारतात ‘फाशी’ सुनावण्यात आलेल्या ‘या’ 5 प्रकरणांची चर्चा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. या चारही दोषींना २२ जानेवारी रोजी फाशी देण्यात येईल. भारतात फाशीची प्रकरणे फार कमी आहेत. यामागील कारण म्हणजे देशातील अत्यंत दुर्मिळ घटनांमध्येच फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. असे असूनही, असे काही भयंकर गुन्हे घडले ज्याने संपूर्ण देश हादरला. यातील एक प्रकरण म्हणजे निर्भया सामूहिक बलात्कार. त्याचप्रमाणे फाशी देण्यात आलेली बरीच प्रकरणे अद्यापही वर्षानुवर्षे चर्चेत आहेत. यामध्ये काही निवडक प्रकरण :

मकबूल बट :
काश्मिरी फुटीरतावादी नेते मकबूल बट यांना ११ फेब्रुवारी १९८४ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. फाशीची शिक्षा मिळाल्यानंतर अनेक संघटनांनी त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. अगदी विमान अपहरण करण्याचा कट रचला पण मकबूलला वाचवण्यात अपयशी ठरले. मकबूल बटचा मृतदेह तिहार कारागृहात पुरला आहे.

अजमल कसाब :
२१ नोव्हेंबर २०१२ रोजी लष्कर-ए-तैयबाचा अतिरेकी आमिर अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी कसाब आणि त्याच्या १० साथीदारांनी मुंबईतील पाच प्रमुख ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात १६६ लोक ठार झाले आणि ३०० लोक जखमी झाले. हल्लेखोरांमधील एक असणाऱ्या कसाबला जिवंत पकडले गेले. तो पाकिस्तानी रहिवासी होता.

याकूब मेमन :
व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेले याकूब मेमन यांना २२ मार्च १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटात दोषी ठरवले गेले होते. ३० जुलै २०१५ रोजी त्याला फाशी देण्यात आली. याकूब मेमनला फाशी देण्याच्या संदर्भात रात्री तीन वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, कोर्टाने फाशीची शिक्षा कायम ठेवली. मुंबई मालिकेत झालेल्या स्फोटांमध्ये २५७ लोक ठार आणि सातशे लोक जखमी झाले. हे स्फोट शहरातील गर्दीच्या ठिकाणी घडले.

अफझल गुरू :
अफजल गुरूला ९ फेब्रुवारी २०१३ रोजी दिल्लीच्या तिहाड़ जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. भारताच्या संसदेवर हल्ल्यात अफझल गुरूची भूमिका होती. तीन महिन्यांच्या शस्त्र प्रशिक्षणासाठी तो पाकिस्तानात गेलेला असल्याचे त्याने कबूल केले होते. यासाठी फाशी देण्याची शिक्षा सुनावली. तो सोपोरचा रहिवासी होता. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांसह १४ जण ठार आणि १६ जखमी झाले. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या भूमिकांविषयी माहिती समोर आली आहे. अफजल गुरूचे पार्थिव तिहारमध्ये दफन करण्यात आले.

धनंजय चटर्जी :
धनंजय चटर्जी यांना १४ ऑगस्ट २००४ रोजी कोलकाताच्या अलिपूर मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली. दक्षिण कोलकाता येथील एका अपार्टमेंटमध्ये ५ मार्च १९९० रोजी एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केल्याप्रकरणी कोर्टाने धनंजयला दोषी ठरवले. धनंजय त्या अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षक होता. सर्वोच्च न्यायालयाने याला एक गंभीर गुन्हा मानला. धनंजय यांनी दया याचिकादेखील दिली पण ती फेटाळून लावण्यात आली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/