ही ‘चिंधीचोरी’ नेमकं करतं कोण प्रवासी की कर्मचारी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – १२ लाख ८३ हजार ४१५ टॉवेल्स, ४ लाख ७१ हजार ७७ चादरी आणि ३ लाख १४ हजार ९५२ अभ्रे हे आकडे आहेत. रेल्वेतील पहिल्या वर्गाच्या डब्यातून चोरीला गेलेल्या वस्तूंची यादी आहे. आता या गोष्टी नेमक्या कोण चोरते़ रेल्वे कर्मचारी की प्रवासी असा प्रश्न रेल्वेला पडला आहे.

फुटकळ वस्तूंची चोरी करणाऱ्यांना ‘चिंधीचोर’ अशा शब्दांत हिणविले जाते. रेल्वे प्रवासात एका वर्षात १४ कोटी रुपये किमतीच्या चादरी, ब्लँकेट टॉवेल्स आणि उशांचे अभ्रे चोरीला गेले आहेत. याबद्दल रेल्वे प्रवाशांवर संशय घ्यावा की, कर्मचाऱ्यांवर ? की डब्यांमध्ये घुसून भुरटेपणा करणाऱ्या चोरांवर ? असा प्रश्न उभा राहिला आहे.

वातानुकूलित डब्यांमध्ये प्रवाशांना २ चादरी, १ उशी, उशीचा अभ्रा, टॉवेल आणि ब्लँकेट दिले जाते. प्रवासी उतरताना या वस्तू जागीच सोडून देतात. नंतर कर्मचारी त्या जमा करून नेतो. मात्र, कॅगच्या अहवालात दरवर्षी अमुक-तमुक संख्येने टॉवेल, चादरी चोरीला गेल्याचा उल्लेख असल्याने ही ‘चिंधीचोरी’ नेमके करते तरी कोण ? अशी शंका निर्माण झाली आहे. ही चिंधीचोरी रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवे फर्मान काढले आहे. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहांई यांच्या माहितीनुसार, एसी कोचमधील प्रवाशांकडून त्यांचे स्थानक येण्यापूर्वी अर्धा तास आधी या वस्तू परत घेतल्या जातील. ही माहिती लोकसभेतही देण्यात आली. रेल्वे प्रवासात टॉवेल्सची चोरी सर्वाधिक होते.

मंत्र्यांनी काय सांगितले आहे, याविषयी अनभिज्ञ असलेले उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार म्हणाले की, प्रवाशांकडून एकदम या वस्तू घेतल्या जातात असे नाही. १० मिनिटे आधी डब्यांमधील कर्मचारी प्रवाशांना सूचना देतो. प्रवासी गाडीतून उतरण्याआधी त्या कर्मचाºयाकडे सोपवितात.