RTI मधून माहिती मागवून बातमी छापून बदनामी करण्याची धमकी, 2 खंडणीखोर पत्रकारांना अटक

माणगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  बातमी छापून बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोर पत्रकारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. आरोपींकडून 2 लाखाची रोकड , दोन मोबाइल, असा एकूण 2 लाख 33 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

भिवा पवार आणि राजन पाटील असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. दोन्ही आरोपी हे सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे, (ता. माणगाव) येथे 2007 पासून शिक्षक म्हणून काम करत असून, शिक्षकाची नोकरी करत एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी म्हणून ते दोघेही काम करतात. याप्रकरणी रमेश भोजा शेट्टी (रा. पुणे) यांनी तक्रार दिली होती.

याबाबतची माहिती अशी की, तक्रादार रमेश शेट्टी यांनी मौजे शिलीम (ता. माणगाव) येथील 28 एकर शेतीमध्ये शासकीय योजना राबविल्या आहेत. त्यात पंतप्रधान मत्स्यसंवर्धन योजनेचा लाभ घेतला; परंतु प्रत्यक्षात काम केले नाही. म्हणून पत्रकार भिवा पवार आणि राजन पाटील यांनी त्यांना माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती घेऊन ती प्रसिद्ध करून बदनामी करू, अशी धमकी देत होते. हे प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून 5 लाखांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी तडजोडीअंती 2 लाख देण्याचे मान्य केले आहे, असे सांगून त्या दोघांविरुद्ध खंडणीची तक्रार दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नावले व पथकाने गोरेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील मुंबई- गोवा महामार्गाच्या बाजूला, लोणेरे (ता. माणगाव) येथे सापळा लावून दोन्ही आरोपींना तक्रारदाराकडून 2 लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात स्वीकारताना रंगेहाथ पकडले. आरोपींविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.