काम बंद करण्याची धमकी देत बिल्डरला 30 लाखांना लुटलं ! नंतर मागितले आणखी 1 कोटी अन्…

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाला लाखो रुपयांचा लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी तब्बल दीड कोटींची खंडणी मागण्यात आली होती. इतकंच नाही तर या रकमेपैकी 30 लाखांची रक्कम घेऊनही पैशांसाठी वारंवार धमकावलं जात होतं. अखेर आता या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील लक्ष्मीकांत नाईकवाडी यांचे पुणे-अकोले-संगमनेर येथे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. याविरोधात वारंवार तक्रार अर्ज दाखल करून ते माघारी घेण्यासाठी 55 लाख रुपये खंडणीची मागणी करून त्यातील 30लाख रुपये स्विकारल्यानंतरही 1 कोटींच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी शहारातील गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे आणि मयुर सुभाष कानवडे (रा. अकोले) अशा एकूण 3 जणांविरोधात अकोले पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीकांत अंबादास नाईकवाडी यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. अकोले येथील मुयर सुभाष कानवडे आणि सुभाष भागुजी कानवडे यांनी बांधकाम प्रकल्पात वारंवार हस्तक्षेप करणं, त्रास देणं, ब्लॅकमेल करणं असे प्रकार सुरू केले होते. या प्रकरणी त्यांनी काही खोटे खोटे तक्रार अर्जही दाखल केले. दुसऱ्या जागेत अतिक्रमण, अनियमित बांधकाम असे अर्ज केल्यानं बांधकाम बंद करावं लागलं होतं. तिघांनीही कामात अडथळे आणले होते.

तक्रारीत असं म्हटलं आहे की, तिघांनीही असं सांगितलं होतं, जर माझ्याकडे 55 लाख रुपये दिले तर अर्ज मागे घेतो. तिन्ही लोकांच्या अर्जामुळं काम रखडलं. सदर प्रकल्पासाठी माझ्यावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज झाल्यानं मी 47 लाख रुपये देण्यास तयार झालो. सदरची रक्कम ते कारण नसताना घेत आहेत, त्यामुळं त्यांनी केलेले अर्ज मागे घ्यावे लागतील असं त्यांना सांगितलं. मयुर कानवडे आणि त्याचे चुलते तयार झाल्यानं गेल्या वर्षभरात मी त्यांना 30 लाख रुपये दिले. परंतु उर्वरीत पैशांसाठी त्यांच्याकडून धमकावणं आणि कामात अडथळे आणणं असले प्रकार मात्र सुरूच आहेत. आता त्यांनी एक कोटींची खंडणी मागितली आहे. मला बरबाद करण्याची धमकी दिली आहे असाही उल्लेख तक्रारीत आहे.

या तक्रारीनंतर अकोले पोलीस ठाण्यात मयुर सुभाष कानवडे, गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे यांच्याविरोधात भादंवि मधील कलम 384, 385 अंतर्गत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.