एकाच प्रभागातील नगरसेवकाकडुन दुसऱ्या नगरसेवकास संपविण्याची धमकी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड मधील एकाच प्रभागातील नगरसेवकाने दुसऱ्या नगरसेवकास संपविण्याची धमकी दिली आहे.

नगरसेवक जावेद शेख यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असून त्यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे शेख यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभागातील साई मंदिर परिसरातील रहिवाशी नागरिकांना गेल्या दोन वर्षांपासून त्रास देण्या-या काही गुंड मुलांना महिलांनी रविवारी (दि.6) चोप दिला. निगडी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी गुन्हा नोंदविला. लोकप्रतिनिधी म्हणून मी नागरिकांसमवेत तिथे थांबलो होतो. तक्रार नोंदविण्यास सांगितली.

तू माझ्या पोरांवर गुन्हा का नोंदवला?, माझ्या मुलांविरोधात तक्रार का केली? या गोष्टीचा राग धरुन नगरसेवक शेख यांने माझ्या मित्रास फोन करुन ‘उसको समजा के रखो, नही तो काट डालुंगा’ अशी धमकी दिली आहे. मध्यरात्री सव्वा एक वाजता आणि पुन्हा सकाळी 11 वाजता फोन करुन धमकी दिल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका आहे. या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालून शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक कुटे यांनी निवेदनातून केली आहे.

या बाबत चौकशी करुन प्रतिबन्धात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील टोणपे यांनी सांगितले.

Visit : Policenama.com