गोंदिया : दुर्दैवी ! जंगलातील वणवा आटोक्यात आणताना 3 मजुरांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन – जंगलात लागलेली भीषण आग आटोक्यात आणताना 3 हंगामी वनमजूरांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. नागझिरा अभयारण्य आणि पिटेझरी वनपरिक्षेत्रात गुरुवारी (दि. 8) रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. दरम्यान या घटनेमुळे वन मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राकेश युवराज मडावी (वय 40, रा. थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (वय 45, रा. धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (वय 27 रा. कोसमतोंडी ) असे होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर विजय तिजाब मरस्कोल्हे (वय 40, रा. थाडेझरी) आणि राजू श्यामराव सयाम (वय 30, रा. बोळूंदा, जि. गोंदीया ) असे गंभीर जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 8) सकाळी साडेअकराच्या सुमारास नागझिरा अभयारण्य व पिटेझरी वनपरिक्षेत्रात आग लागली. ही आग विझविण्याचे 50 ते 60 वनकर्मचारी व हंगामी मजूर करत होते. सायंकाळी 6 वाजतापर्यंत काही प्रमाणात आग आटोक्यात आली. मात्र याच दरम्यान पुन्हा जोरात वारे सुटल्याने आग वाढली. आग आटोक्यात आणताना आगीने चारही बाजुने वनमजुरांना वेढा घातला. मध्यभागी 5 ते 6 मजूर अडकले. यात तीन मजुरांचा होरपळून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर झाले. हे सर्व वनमजूर हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. या घटनेमुळे ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.