पुण्यातील धक्कादायक प्रकार : पोलीस उपनिरीक्षकाला केली अश्लिल शिवीगाळ

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – राँग साईडने आलेल्या कारचालकाला हळू कार चालविण्यास सांगितल्याने अश्लिल शिवीगाळ करुन साध्या वेशातील पोलीस उपनिरीक्षकाची कॉलर पकडणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करु नये, यासाठी येरवडा परिसरातील नेत्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तसेच त्यांच्या वरिष्ठांना फोन करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला न जुमानता तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. हा प्रकार खराडी बायपास रोडवरील चौकात मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

याप्रकरणी अभिषेक रामदास येवले (वय २२, रा. खराडी), मंगेश विठ्ठल गायकवाड (वय २८, रा. चंदननगर) व नवनाथ यशवंत हारगुडे (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या पोलीसाला केले निलंबित 

याप्रकरणी पोलिस शिपाई विकास धावडे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास धावडे व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक दीपक जाधव हे तपासासाठी मंगळवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यात खासगी कारने जात होते. ते साध्या वेशात होते. तपासाला जाण्यापूर्वी ते पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यासाठी खराडी बायपास रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी राँग साईडने एक कार येत असल्याचे दिसले. त्यामुळे जाधव यांनी त्यांना हात दाखवून मोठ्या आवाज देत सावकाश चालवण्यास सांगितले. त्यावेळी तिघांनी कार थांबवली. तसेच, त्यांच्याजवळ येऊन तुम्ही आम्हाला कोण सांगणार असे म्हणत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. जाधव यांनी तिघांना आम्ही पोलीस आहोत, असे सांगत समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही तिघांनी त्यांच्याशीही हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ केली. जाधव यांची कॉलर पडकली. तसेच, तुम्ही तपासाला कसे जाता असे बोलत तुमची गाडी कशी जाते हेच पाहू असे म्हणत त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. धावडे यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिघांना विमानतळ पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पाठोपाठ तेथील संबंधित पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या वरिष्ठांना तातडीने स्थानिक नेत्यांचे फोन येऊ लागले. आरोपींवर गुन्हा दाखल केला, तर बघून घेऊ, असे सांगत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला होता. तरीही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करुन तिघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.