‘अ‍ॅन्टीक’ मुर्त्यांची तस्करी करणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अलिबागमध्ये वराहअवतार आणि लक्ष्मीच्या पुरातन मूर्तींची तस्करी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पुरातन दोन मूर्ती जप्त करण्यात आल्या असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही कारवाई अलिबाग येथील सारळपुल गोकुळढाबा येथे ठाणे गुन्हे शाखा घटक -1 आणि मांडवी सागरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संयुक्तरित्या सापळा रचून केली.

ठाणे पोलीस संबंधित आरोपींचा शोध घेत असताना सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा (एमएच 06 एडब्ल्यू 3637) कारमधून पूरातन अनमोल मुर्त्यांची तस्करी करण्यासाठी तीन इसम अलिबाग येथील गोकुळढाबा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून गोकुळढाबा येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या कारची झडती घेतली असता वराह अवताराची 8 किलो 700 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि 6 किलो 827 ग्रॅम वजनाची लक्ष्मीची मूर्ती आढळून आली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी या मुर्त्या कोठून आणल्या आहेत याची माहिती समजू शकली नाही. या दोन्ही मूर्ती पुरातत्व विभागाकडे सोपवल्या असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त सुरेश मेकला, अपर पोलीस आयुक्त गुन्हे प्रविण पवार, पोलीस उपायुक्त गुन्हे दिपक देवराज, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, सहायक पोलीस आयुक्त शोध -1 किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक- 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल, पोलीस हवालदार शिवाजी गायकवाड, अबुतालीब शेख, पोलीस नाईक अजय साबळे, दादा पाटील, मांडवी सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके, पोलीस हवालदार विनोद जाधव, प्रदिप झिमसे, सुधीर पाटील यांनी संयुक्त पणे केली.

Visit : policenama.com