बोट दुर्घटना : अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या ३ जणांचा मृत्यू, ५ जण बेपत्ता

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – आईच्या अस्थि विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या नांदेड जिल्यातील १४ जणांची बोट पाण्यात उलटल्याने ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ५ जण बेपत्ता झाले आहेत. ही घटना सोमवारी (१०) सायंकाळी घडली. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा आज (मंगळवार) पुन्हा शोध घेण्यात येत असल्याचे प्रयागराज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील बैस कुटुंबीय उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैंस यांच्या आईच्या अस्थिविसर्जनासाठी गेले होते. अस्थी विसर्जनासाठी एकूण १४ जण गेले होते. प्रयागराज येथील कीडगंज येथील सरस्वती घाटावर सोमवारी सायंकाळी नाव उलटली. यातमध्ये भागाबाई बळीराम (वय – ६५), राधाबाई (वय – ५५) आणि लक्ष्मीबाई केशवराज (वय – ५५) या तीन महिलांचा मृत्यु झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर दिंगबर रामराव बैस (वय – ७२), बालाजी दिगंबर (वय-५०), रमाकांत दिगंबर (वय-४०) आणि देवीदास नारायण कछवे  (वय -५५) हे चौघेजण बेपत्ता झाले आहेत.  या घटनेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील भोजराज घनश्याम (वय -७०) हेही बेपत्ता झाले आहेत. कोलंबी येथील मनोहर माणिकराव (वय -३२) आणि  चंद्रपूर येथील मीनाक्षी रोशन पटवार (वय- ३८) यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे.

पाण्यातून बाहेर काढलेल्या कोलंबी येथील सुनीता देवीदस कछवे  (वय-५०), ज्योती बालाजी  (वय-४५) तसेच अहमदपूर येथील अंगद नारायण कछवे (वय -४७) आणि केशव कछवे (वय – ७०) यांच्यावर एसआरएन  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या व्यक्तीबाबत प्रयागराज प्रशासन नांदेड जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संपर्कात असल्याचे नांदेड जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.