पुणे : थेट आरोपींना मदत केल्याप्रकरणी बारामती आणि भिगवण पोलिस ठाण्यातील 3 कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आरोपींना गुन्हा दाखल झाल्याची माहिती देणे तसेच फिर्यादीवर दबाव आणून प्रतिज्ञापत्रकावर सह्या घेतल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बडतर्फ केले आहे. भिगवण पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले अभिजीत एकशिंगे, बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले तात्या विनायक खाडे व भगवान उत्तम थोरवे असे बडतर्फ करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोपट तुकाराम थोरवे (रा. म्हसोबावाडी ता. पुरंदर) यांनी त्यांना झालेल्या मारहाणीविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सदर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस कर्मचारी अभिजीत एकशिंगे यांनी त्यांच्या मोबाईलवरून आरोपींना दिल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा शोध घेत असून एकशिंगे यांनी त्याच्याशी झालेल्या संभाषणाची माहिती प्रभारी अधिकाऱ्यांना दिली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती आरोपींना मिळाल्याने ते फरार झाले. त्यामुळे पोलिसांना त्यांना अटक करता आली नाही.
दरम्यान याच प्रकरणात बारामती शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले तात्या विनायक खाडे व भगवान थोरवे यांनी आरोपींशी आर्थिक सलगी करून पोपट थोरवे या फिर्यादीवर दबाव आणला. तसेच न्यायालय प्रतिज्ञापत्रकावर सह्या करण्यास भाग पाडल्याचा ठपका दोघांवर ठेवण्यात आला. त्यामुळे या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे कृत्य हे पोलीस दलाच्या सचोटीला न शोभणारे, शिस्तीला बाधा आणणारे असल्याने पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी या तिघांना सेवेतून बडतर्फ केले.