कौतुकास्पद ! मुलांनी बांधलं आई-वडिलांचं मंदिर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या जमान्यात संसारात आई-वडिलांचा अडसर होतो, म्हणून मुलांनी त्यांना घराबाहेर काढल्याची अनेक उदाहरण आपण पाहिली आहेत. पण याच समाजात अशी सुद्धा काही मुलं आहेत, ज्यांच्यासाठी आई-वडिल परमेश्वरासमान असून, ते आई-वडिलांची पूजा करतात. आपल्या संस्कृतीत आई-वडिलांना देवाचा दर्जा आहे. आई-वडिलांना ईश्वरासमान मानले जाते. असचं एक आदर्श उदहारण समोर आलं आहे. कर्नाटकाच्या कलबुर्गी जिल्ह्यात माता-पित्याच्या भक्तीचं.

कलबुर्गी जिल्ह्याच्या नीरागुडी गावात राहणाऱ्या तीन मुलांनी आई-वडिलांच्या प्रेमापोटी त्यांच्या स्मरणार्थ चक्क मंदिर बांधलं आहे. सोमवारी या मंदिराचं उद्घाटन झालं. तीन वर्षांपूर्वी विश्वानाथ पात्रे या शेतकऱ्याचं निधन झालं. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पात्रे यांचं निधन झालं. आई-वडिलांच्या निधनानंतर विश्वनाथ पात्रे यांच्या तिन्ही मुलांनी आठवण म्हणून एक मंदिर बांधलं.

हे मंदिर उभारणीसाठी मुलांनी दोन लाख रुपये खर्च केले. उद्घाटनाला गावकऱ्यांनी उपस्थित राहून, त्यांच्या या कार्याचे कौतुक केले. विश्वनाथ आणि लक्ष्मीबाईंनी मुलांना शिक्षण देऊन चांगलं नागरिक बनवलं. आज त्यांच्या मुलांनी इतरांसाठी आदर्श ठरणार काम केल्याची भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवली. जगन्नाथ (४५), दशरथ (४२) आणि धनंजय (३८) यांनी या मंदिरात आई-वडिलाचे अर्धपुतळे बसवले आहेत, जेणेकरुन त्यांना आई-वडिलांची पूजा करता येईल.