धक्‍कादायक ! मुलाच्या शाळेच्या ‘फी’ने घेतला तिघांचा ‘प्राण’

चेन्नई : वृत्तसंस्था – मुलगा चांगल्या शाळेत शिकून मोठा व्हावा, अशी सर्वच आईवडिलांची अपेक्षा असते. त्यासाठी ते परवडत नसतानाही मोठ्या शाळेत घालतात. त्यासाठी प्रसंगी पदरमोड करुन शाळेची भरमसाट फी भरतात. मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी वडिलांनी काही जणांकडून उधार पैसे घेतले होते. हे पैसे परत करता न आल्याने व त्यांचा सततचा तगादा यामुळे एका दाम्पत्याने ११ वर्षाच्या मुलासह आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार तामिळनाडुमध्ये घडला.

नागपट्टणम जिल्ह्यातील वेलियापालम गावी हा प्रकार घडला. सेंदिल कुमार नावाच्या एका सोनाराचा ११ वर्षांचा मुलगा खासगी शाळेत सहावी इयत्तेत शिकत होता. सेंदिल कुमारचा व्यवसाय नीट चालत नव्हता. त्यामुळे मुलाची शाळेची फी भरण्यासाठी त्याने परिचयाच्या काही लोकांकडून पैसे घेतले होते. ते परत करणे त्याला शक्य होत नव्हते. त्यामुळेच सेंदिल व त्याच्या पत्नीने आत्महत्येचा निर्णय घेतला, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. सेंदिल कुमार याच्या सांगण्यावरून पत्नीने वा प्रत्यक्ष त्यानेच जेवणात विष मिसळले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. जेवल्यानंतर ते तिघेही घरातच मरण पावले. मुलगा तर शाळेच्या युनिफॉर्ममध्येच होता.

सेंदिल कुमारने वा त्याच्या घरातील सर्वांनी आत्महत्या केल्याचे आधी कोणालाच समजले नाही. त्याला नेहमीप्रमाणे काही जण फोन करीत होते. पण बराच वेळ फोन न उचलला गेल्याने काही लोक व नातेवाईक त्याच्या घरी गेले. तिथे गेल्यावर तिघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्याला दर महिन्याला मुलाची फी भरणे अवघड झाले होते. त्यामुळे उसनवारी करून तो कशीबशी ती फी भरत असे. त्यामुळे अनेकांनी पैसे परत मिळावेत, यासाठी त्याच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे सेंदिल कुमार निराश झाला होता.