तीन वेळा पोलीस संरक्षण दिले आणि अचानक काढून घेतले ?

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – सख्ख्या भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी असलेल्या साक्षीदार भावाला पोलिसांनी तीन वेळा पोलीस संरक्षण दिले. मात्र ते अचानक काढून देखील घेतले हा कसला पोरखेळ असा संतप्त सवाल 33 वर्षे भावाच्या खुन्यांना शिक्षा व्हावी म्हणून न्यायालयीन लढाई लढणारे आणि राज्य सरकार पुरस्कृत आदिवासी सेवक गंगाधर म्हात्रे यांनी केला आहे. 29 जुन 1987 रोजी वसई पूर्व येथे यादव म्हात्रे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

खूनाची घटना घडली त्यावेळी त्यांचे भाऊ गंगाधर म्हात्रे हे घटनास्थळी हजर होते. व तेव्हापासून आजपर्यंत या खटल्यातील ते प्रत्यदर्शी साक्षीदार म्हणून खटला लढवत आहेत. मागील 33 वर्षापासून ते आपल्या भावाच्या खुनातील खऱ्या आरोपीला शासन होण्यासाठी एकाकी लढा देत आहेत. या खटल्यात ते एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांना शासनाकडून विनामुल्य पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र कालांतराने हे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले.

पोलीस संरक्षण काढून घेतल्यानंतर गंगाधर यांच्यावर 13 एप्रिल 2005 रोजी प्राणघातक हल्ला झाला. त्यामुळे कोकण आयुक्तांच्या आदेशानुसार 14 सप्टेंबर 2016 ला त्यांना पुन्हा पोलीस संरक्षण देण्यात आले. त्यानंतर कोणतेही कारण न देता पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाने 24 मे 2017 रोजी पोलीस संरक्षण काढून घेतले. यानंतर खटल्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 एप्रिल 2018 मध्ये गंगाधर यांना तिसऱ्यांदा संरक्षण दिले पण 29 डिसेंबर 2019 ला काढून घेतले. गंगाधर यांनी आदिवासी बांधवांच्या अनेक प्रश्नाला वाचा फोडल्याने त्यांचा शासनाकडून ‘आदिवासी सेवक’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

सध्या हा खटला अंतिम टप्प्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी, साक्ष देण्यासाठी म्हात्रे यांना स्थानिक पेक्षा जिल्हा किंवा राज्यभर किंवा बाहेर देखील ठिकठिकाणी जावे लागते. त्यामुळेच त्यावेळेस त्यांच्यावर पोलीस संरक्षण नसताना प्राणघातक हल्ला झाला होता. आता तो अधिक होण्याचे संकेत आहेत. तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक प्रकरणात देखील म्हात्रे हे साक्षीदार आहेत.

पोलीस संरक्षणासाठी फरफट – गंगाधर म्हात्रे
वसईत 33 वर्षे झाली माझ्या भावाच्या खुनाच्या खटल्यातील मी प्रत्यक्ष साक्षीदार असून पोलीस संरक्षणासाठी माझी फरफट सुरु आहे, खरंतर या खून खटल्यात मी साक्षीदार असल्याने मला तीन वेळा पोलीस संरक्षण देण्यात आले. मात्र डिसेंबर 2019 पासून ते काढून घेतल्यानंतर माझ्यावर प्राणघातक हल्ला ही झाला. आणि आताही जीवाला धोका आहे. त्यामुळे मी पुन्हा विनामुल्य पोलीस संरक्षणाची मागणी केल्याचे गंगाधर म्हात्रे यांनी सांगितले.

माहिती घेऊन कार्यवाही करु – पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे
आदिवासी सेवक तथा अर्जदार म्हात्रे यांना पोलीस संरक्षण मिळण्याबाबत त्यांनी संबंधित पत्रव्यवहार काय केला आहे व त्याची पोलीस आयुक्तांलय कार्यालयाकडून माहिती घेतो व त्यानंतरच या प्रश्नी उचित कार्यवाही करु, असे परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी सांगितले.