चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांवर उपासमारीची वेळ; एक वर्षापासून थकीत असलेले मानधन देण्याची पत्रपरिषदेत मागणी

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या एक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे मानधन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, हे सर्व थकीत मानधन दिवाळीपूर्वी देण्यात यावे, अशी मागणी होमगार्ड जवानांनी भद्रावती येथे दि.10 नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या एका पत्रकार पत्रपरिषदेतून केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 1035 होमगार्ड जवान कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेतून आपल्या काही मागण्याही शासनासमोर ठेवल्या आहेत.1 ऑक्टोबर ते 10 जानेवारी 2020 पर्यंतचे कायमस्वरूपी बंदोबस्ताचे तर सप्टेंबर ते डिसेंबर 2019 पर्यंतच्या साप्ताहिक कवायतीचे भत्ते अद्याप होमगार्डना मिळालेले नाही. यासोबतच जे महिला होमगार्ड ज्या पोलीस ठाण्याअंतर्गत राहतात त्यांना त्याच भागात बंदोबस्तासाठी लावण्यात यावे. कायमस्वरूपी बंदोबस्त निधीअभावी बंद करण्यात आला तो पूर्ववत सुरू करण्यात यावा. कोरोना काळात 45 वर्षांवरील होमगार्डांना बंदोबस्तात घेण्यात यावे. त्याचप्रमाणे पोलीस भर्तीमध्ये होमगार्डना अनुभव विचारला जातो. हे लक्षात घेऊन त्यांना अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागण्यासुद्धा पत्रपरिषदेच्या माध्यमातून शासनासमोर ठेवण्यात आल्या. दिवाळीत आर्थिक गरज लक्षात घेता चंद्रपूर जिल्हातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा,चिमूर गोंडपिपरी, नागभीड, राजुरा या भागातील सर्व होमगार्डन दिवाळीपूर्वी त्यांचे सर्व थकीत मानधन देण्यात यावे, अशीही मागणी पत्रपरिषदेतून करण्यात आली.

पत्रपरिषदेला भारतीय मजदूर संघाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष मनोहर साळवे, होमगार्ड सीमा गाजघाटे, भारती उंदिरवाडे, अमोल नागपुरे, अखिलेश मिश्रा, आझाद वाघमारे यांच्यासह अनेक पुरुष व महिला होमगार्ड उपस्थित होते.