Yes Bank वर ‘संकट’ येणार असल्याचं पुर्वीच ओळखलं होतं ‘तिरूमल्ला तिरूपती मंदिर ट्रस्ट’नं, ‘असे’ वाचवले 1300 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – येस बँक संकटापूर्वी आंध्र प्रदेशातील तिरूमल्ला येथील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर ट्रस्टचे एक पाऊल त्यांच्यासाठी वरदानच ठरले आहे. दरम्यान, या मंदिराच्या ट्रस्टने काही महिन्यांपूर्वी येस बँकेतून 1300 कोटी रुपये काढले होते. वाय.व्ही. सुब्बा रेड्डी तिरूमल्ला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष झाल्यावर लवकरच अधिकाऱ्यांना येस बँकेतील ठेवी मागे घेण्यास सांगितले. या ट्रस्टने 4 खासगी बँकांमध्ये निधी जमा केला असून त्यापैकी येस बँक देखील एक आहे.

मुख्यमंत्र्यांनाही दिली माहिती :
सुब्बा रेड्डी यांनी या खासगी बँकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतर येस बँकेकडून 1300 कोटी रुपये काढण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या निर्णयासाठी त्यांना ट्रस्टच्या इतर सदस्यांच्या दबावाचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांना या प्रकरणाची माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतरच त्यांनी येस बँकेतून ही रक्कम काढण्याचे आदेश दिले होते.

TTD जगातील दुसरा श्रीमंत ट्रस्ट :
तिरुमाला तिरुपती देवस्थानम, थोडक्यात टीटीडी, आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर सांभाळणारी स्वतंत्र ट्रस्ट आहे. ट्रस्ट जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत आणि नामांकित धार्मिक केंद्र आहे. हे विविध सामाजिक, धार्मिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्रियांमध्ये देखील सामील आहे. टीटीडीचे मुख्यालय तिरुपती येथे असून जवळपास 16,000 लोक काम करतात.

दरम्यान, येस बँकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता 5 मार्च रोजी केंद्र सरकारने बँकेबाबत काही निर्णय घेतले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर या बँकेचा कोणताही ठेवीदार त्याच्या खात्यातून 50 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढू शकत नाही. येस बॅँकेवर 3 एप्रिल 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. येस बँकेवरील या बंदीनंतर सरकारने ठेवीदारांना काळजी करण्याची काही गरज नाही असे आश्वासन दिले आहे. बँकेत त्याची ठेव पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सरकारने यावेळी स्पष्ट केले.