TMC उमेदवाराचा ‘कोरोना’नं मृत्यू; पत्नीचा EC वर हत्येचा आरोप

कोलकाता : वृत्तसंस्था –   कोरोनाचा संसर्ग झाल्याने तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार काजल सिन्हा यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामध्ये काजय यांच्या पत्नी नंदिता यांनी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नंदिता यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

काजल सिन्हा यांच्या पत्नी नंदिता यांनी निवडणूक आयोगाचे अधिकारी सुदीप जैन यांच्याबरोबर निवडणुक आयोगातील इतर अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नंदिती यांनी निवडणुक अधिकाऱ्यांवर आरोप करताना कोरोना कालावधीमध्ये उमेदवार आणि सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासंदर्भात आयोगाने काहीच उपाययोजना केल्या नव्हत्या असा आरोप नंदिता यांनी केला आहे.

काजल सिन्हा हे उत्तर 24 परगना जिल्ह्याच्या खडदह विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत काजल सिन्हा हे 21 एप्रिल रोजी कोरोन पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना 25 एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. काजल सिन्हा यांच्या पत्नी नंदिता सिन्हा यांनी खडदह पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली आहे. नंदीता यांनी निवडणूक उपायुक्त सुदीप जैन तसेच इतर अधिकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 269, 270 तसेच 304 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.