‘संघर्षाची परिसीमा गाठत यश मिळवलं’, राज ठाकरेंनी केलं ममतादीदींचं अभिनंदन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   देशात चर्चेत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ममता बॅनर्जींना गुलाबांचा गुच्छ देतानाचा स्वत:चा फोटो पोस्ट करत राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा उल्लेख असणाऱ्या काही ओळी लिहीत ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे. आणि ह्या निडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलंत. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खपू मोठी परंपरा, ह्या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्यांच्यात खूपच समानता आहे, आणि त्यामुळेच राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता ह्यांचं महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन, अशा शब्दात राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी यावेळी तामिळनाडूत मिळवलेल्या विजयाबद्दल स्टॅलिन आणि डीएमके पक्षांचंही अभिनंदन केलं. करुणानिधींप्रमाणे आपणही प्रांतिक अस्मितेला प्राधान्य द्याल, अशी आशा राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.