सुधीर मुनगंटीवार यांची उचल बांगडी करा : मनेका गांधी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – अवनी या नरभक्षक वाघीणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर राज्याच्या सरकारवर चौफेर टीका होत असताना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी परवा पासून या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी परवा अवनी संदर्भात ट्विट करून या प्रकरणात सहभाग नोंदवला. त्यावर मुनगंटीवार यांनी केंद्राने कायदा बदलून वनाधिकाऱ्याचे अधिकार काढून घ्यावे असे स्पष्ट सुनावले असता, आता सुधीर मुनगंटीवार यांना हटवण्याची मागणी मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

म्हणून मी ‘अवनी’वर गोळी झाडली : नवाब अजगरअली 

मागच्या काही दिवसापूर्वी यवतमाळ, पांढरकवडा भागात अवनी नावाच्या वाघिणीने १३ निष्पाप मनुष्याचें प्राण घेतले होते. त्यानंतर या प्रकरणी त्या वाघिणीला मारण्याचे निश्चित केले आणि चार दिवसा पूर्वी त्या वाघिणीला ठार मारण्यात आले. त्यानंतर त्या संदर्भातील वादाला तोंड फुटले आहे. मनेका गांधी यांनी या वाघिणीला मारण्याच्या कृतीला चुकीचे म्हटले असून आपण या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. तसेच वन्यजीव कार्यकर्ते जेरील बनैट यांनी वाघिणीला ठार मारण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगीतले आहे. या आधी अवणीला जीवे मारण्याच्या वन विभागाच्या आदेशाच्या विरोधात त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुनगंटीवार यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले कि, मनेका गांधी या वन्यजीव कायद्याच्या बाबतीत सदैव आग्रही राहिल्या असून त्यासंदर्भात त्यांच्याशी माझे अनेकदा फोनवरून बोलणे झाले आहे. मनेका गांधी आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत तसेच त्यांचे वक्तव्य मी संवेदनशीलपणे घेतले असून यावर मी त्याच्याशी बोलणार आहे. या प्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एकंदरच राज्याचे राजकारण तापवलेल्या विषयाने देशाच्या राजकारणात हि पडसाद उमटवले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे. हा मुद्दा आगामी काळात असाच गरम राहण्याची संभावना आहे.