Mumbai : सध्याची परिस्थिती पाहाता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा – महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने राज्यात कडक निर्बध लागू केले आहे. तर पूर्णपणे लॉकडाऊन न करता काही उद्योग सेवांना यामधून सवलत देण्यात आलीय. तर या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनी आपली भूमिका मांडली आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती बघता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा, असं मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या लॉकडाऊनवरून विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. दरम्यान, मुंबई महापौरांनी निर्बंधाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबईतल्या ५ टक्के बेजबाबदार नागरिकांमुळे उरलेल्या ९५ टक्के नागरिकांना अडचण होत असल्याचं महापौर यांनी म्हटलं आहे. ९५ टक्के मुंबईकर कोरोनाच्या नियमांचं पालन करतात. मात्र, ५ टक्के लोकं निर्बंधांचं पालन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते. यासाठीच मला वाटतं सध्याची परिस्थिती बघता संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या आहेत.

पुढे त्या म्हणाल्या की, कुंभमेळ्याहून परत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. कुंभमेळ्याहून आपापल्या राज्यात जाणारी लोकं सोबत ‘प्रसाद’ म्हणून कोरोना आणत आहेत. या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये क्वारंटाईन करायला हवं. त्याचा खर्च त्या लोकांकडूनच घ्यायला हवा. मुंबईत देखील आम्ही कुंभ मेळ्याहून परतणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्याचा विचार करत आहोत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.