शेतकर्‍यांच्या आंदोलनात आज राहुल गांधींची उडी, कृषी कायद्यांविरोधात काढणार विरोध मोर्चा

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात मागील 27 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद देशासह जगभरात उमटत आहेत. काही दिवसांपासून या आंदोलनात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चा थांबल्याचे दिसत होते. मात्र, आता शेतकर्‍यांनी काही अटींसह चर्चेची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, या वादग्रस्त कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी विरोध मार्च काढणार आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष या मार्चकडे असणार आहे.

विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनपर्यंत मार्च करतील. या दरम्यान राहुल यांच्या नेतृत्वाखाली इतर काँग्रेस खासदार सुद्धा सहभागी होणार आहेत. यानंतर राहुल आणि अन्य वरिष्ठ नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील आणि त्यांच्या हस्तक्षेपासाठी दोन कोटी सह्यांचे निवेदन सादर करतील. काँग्रेस खासदार के सुरेश यांनी ही माहिती दिली.

पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारने कृषीविरोधी कायदा करून शेतकर्‍यांचे नुकसान केले आहे. आणि आता त्याचे मंत्री शेतकर्‍यांचा अपमान करत आहेत. वेणुगोपाल म्हणाले, ’कृषीविरोधी कायदाविरोधी आंदोलनाला बळ देण्यासाठी काँग्रेसने या कायद्याविरोधात देशव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविली. हे कायदे मागे घ्यावे या मागणीच्या बाजूने सुमारे दोन कोटी लोकांच्या सह्या गोळा केल्या आहेत.

वेणुगोपाल म्हणाले की, 24 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राष्ट्रपतींना स्वाक्षर्‍यांचे निवेदन सादर करतील आणि तीनही कायदे रद्द करण्याची मागणी करतील. तत्पूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी सकाळी 10.45 वाजता विजय चौक ते राष्ट्रपती भवनाकडे कूच करतील. यावेळी राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे अन्य खासदारही यात भाग घेतील.

काँग्रेस नेत्याने दावा केला की, कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 27 दिवसांपासून निदर्शने करीत आहेत. आतापर्यंत 44 शेतकर्‍यांनी जीव गमावला आहे. अहंकारी मोदी सरकारने आधी शेतकर्‍यांना वेदना दिली आणि आता त्याचे मंत्रीही शेतकर्‍यांचा अपमान करत आहेत.