रिकामा ट्रॅक्टर घेऊन निघालेल्या चालकाला काळाने वाटेतच संपवले

मांगले / सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टर (Tractor) चालकाचा (Driver) वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर बाजूच्या नाल्यात पडला. या अपघातात (Accident) ट्रॅक्टर चालकाचा ट्रॉलीच्या चाकाखाली आल्यामुळे जागीच मृत्यू (Dead) झाला. ही घटना कांदे ते मांगले (mangle) दरम्यान कारपेटीजवळ घडली. पंकज संजय काळेल (वय-21 रा. म्हसवड, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील उदय सहकारी साखर कारखान्याचा ऊस उतरून परतत असताना हा अपघात झाला.

शिराळा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांगले-कांदे दरम्यान कारपेटीजवळ कारखान्यांकडून ऊस उतरून रिकामा ट्रॅक्टर घेऊन वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावाकडे निघालेला ट्रॅक्टर मृत पंकज चालवत होता. ट्रॅक्टरवरील वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे विरुद्ध बाजूच्या खोल नाल्यात ट्रॅक्टर गेला. पंकज ट्रॅक्टरच्या स्टेरिंगवरुन मागील ट्रॉलीच्या चाकाखाली पडला. नाल्यात गवत असल्यामुळे सकाळी आठपर्यंत ट्रॅक्टर नाल्यात पडून होता.

काही वेळाने या मार्गावरुन जाणाऱ्या काही प्रवाशांनी जवळ जाऊन पाहिले असता ट्रॉलीच्या चाकाजवळ गवतात पाय दिसले. डोके व धड ट्रॉलीच्या चाकाखाली होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, या अपताची माहिती मिळताच मृत पंकजच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंकजचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. पुढील तपास पोलीस करत आहेत.