चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामांमुळे सोमवारपासून वाहतुकीत बदल

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाईन –   चांदणी चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने चांदणी चौक पुलावरुन कोथरुड व साताऱ्याच्या दिशेने जाणारा सेवारस्ता सोमवार (दि. 15) पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पिंपरी- चिंचवड वाहतूक शाखेने कळवले आहे. त्यामुळे नागरीकांनी गैरसोय होवू नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कोथरूड, वारजे, बाणेर आदी भागातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी चांदणी चौकात दुमजली उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. चांदणी चौकातून हे पुल मुंबई, सातारा, मुळशी आणि कोथरूडला जोडले जातील. सध्या या कामासाठी सेवा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असला तरी पर्यायी मार्ग म्हणून भूगाव, एनडीए आणि कोथरुड रस्त्यावरुन येणारी वाहतूक ही चांदणी चौक पुलावरुन पाषाणकडे जाणा-या रस्त्यावरील व्हीवा हॉटेल येथून डाव्या बाजूस वळून महामार्गावरुन चांदणी चौक वा साताऱ्याच्या दिशेने जाता येणार आहे. बावधन व पाषाण कडून येणारी वाहतूक चांदणी चौक पुलावर न जाता ती वाहने व्हीवा हॉटेल येथे उजवीकडे वळून महामार्गावरुन चांदणी चौक व साताऱ्याच्या दिशेने जातील. पुढील आदेश येईपर्यंत वाहतूकीत बदल केला असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.