सोरायसिसवर करा वेळीच उपचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आयुर्वेदात सोरायसिस या रोगाचं वर्णन कुष्ठरोग प्रकरणात आलेलं दिसून येतं. आयुर्वेदानुसार या विकारात मुख्यत: कफ आणि वात हे दोष बिघडल्यानं हा रोग होतो. तसंच सात त्वचेपैकी चौथ्या किंवा पाचव्या थरात बिघाड आल्यानं हा रोग होतो. पेशी विभाजनानं त्वचेमध्ये हे स्तर तयार होतात. पेशी विभाजनाचं कार्य हे वातदोषामुळे घडतं. सोरायसिस हा एक त्वचारोग आहे.

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती बिघडल्यामुळे हा रोग होत असतो. हा रोग वयाच्या कुठल्याही वर्षी होऊ शकतो, तसेच घरी आई-वडील, मामा, मावशी, काका, आत्या, आजी-आजोबा यापैकी कोणालाही हा आजार असल्यास हा आजार पुढच्या पिढीला पण होऊ शकतो म्हणजेच हा आजार आनुवंशिकदेखील आहे. यामध्ये रक्तदोष मोठ्या प्रमाणात होते. कारण येणारा ताणतणाव व जेवणातील अनियमितपणा हे असते.

सोरायसिस या रोगाची सुरुवात डोक्याच्या टाळूवरून, कानांमागून, हाताचे कोपरे आणि माकड हाड, गुडघ्यावरील त्वचा किंवा जिथे वारंवार घर्षण होते अशा ठिकाणापासून होते तसंच बेंबीपासून होत असते. त्या भागात छोटीशी रुपेरी रंगाची खपली असलेली लहानशी पुरळ तयार होते. ही पुरळ हळूहळू कडेने पसरू लागते. कालांतराने त्यावरील पापुद्रा जाड होऊ लागतो. त्या भागात खाज-कंडू हे लक्षण अधिक प्रमाणात दिसून येते. खूप खाजवल्यानंतर त्यातून पाण्यासारखा चिकट स्राव येतो. डोक्यामध्ये कोंडा वाढतो. हा कोंढा हे पहिले लक्षण सोरायसिसमध्ये असते. त्वचेच्या ठिकाणी खपल्या तयार होतात. काही काळानंतर हा आजार सर्व शरीरभर पसरतो. झोपेमध्ये अधिक खाजविल्यामुळे जखमा होतात. त्वचेमधून कोंडा निघायला लागतो. तेथील त्वचा ही सोललेल्या कोंबडीप्रमाणे दिसू लागते. तेथील त्वचा कोरडी पडते. त्वचेला कपड्याचा स्पर्शदेखील सहन होत नाही. या रोगाची वेळेवर चिकित्सा केली नाही तर हा रोग उपद्रवस्वरूप अनेक रोगांना जन्म देणारा ठरतो. त्यात संधिवात हा एक महत्त्वाचा उपद्रव असतो.