लग्न सोहळ्यात गोंधळ घालणार्‍या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यावर मोठी कारवाई

नवी दिल्ली : त्रिपुरात कोरोना काळात सुरू असलेल्या एका विवाह सोहळ्यात उन्मतपणा करत कार्यक्रम थांबवल्याने चर्चेत आलेल्या शैलेश यादव यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने बुधवारी हायकोर्टाला याबाबत माहिती दिली. शैलेश यादव पश्चिम त्रिपुराचे डीएम होते. त्यांनी एक लग्न सोहळा जबरदस्तीने थांबवला आणि तिथे उपस्थित लोकांशी गैरवर्तन केले होते.

बुधवारी एका सुनावणी दरम्यान हायकोर्टाने शैलेश यादव यांच्याबाबत राज्य सरकारला प्रश्न विचारले आणि त्यांच्यावर केलेल्या कारवाईची माहिती घेतली. राज्य सरकारने न्यायालयास सांगितले की, शैलेश यादव यांना आता त्यांच्या पदावरून मुक्त करण्यात आले आहे, ते 12 दिवसांच्या सुटीवर आहेत.

यानंतर न्यायालयाने सरकारला विचारले की, अजूनपर्यंत शैलेश यादव यांना पश्चिम त्रिपुरामध्येच का रोखण्यात आले आहे, ज्यानंतर न्यायालयाने सरकारला अर्धा तासाचा वेळ देत नवीन पोस्टींगची माहिती मागितली. आता सरकारने शैलेश यादव यांची साऊथ त्रिपुराच्या बेलोनिया जिल्ह्यात बदली केली आहे.

मात्र, अजून शैलेश यादव यांना पद देण्यात आलेले नाही. राज्य सरकारने 26 एप्रिलला आगरतळा जवळ झालेल्या घटनेनंतर शैलेश यादव यांच्याविरोधात चौकशी आदेश दिला आहे. न्यायालयाने सरकारला हे सुद्धा विचारले की, त्यांनी ही माहिती द्यावी की त्या दिवशी डीएमच्या आदेशावर किती महिलांना अटक करण्यात आली.

नियमानुसार, मॅजिस्ट्रेटच्या परवानगी शिवाय सायंकाळी 6 वाजतानंतर महिलेला अटक करता येऊ शकत नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला होता, ज्यामध्ये डीएम शैलेश यादव एका लग्न सोहळ्यात घुसतात आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी गैरवर्तन करत कार्यक्रम रोखतात.