Pune News : काँग्रेसच्या वर्धापनदिनाला भाजप नेत्यांची हजेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचा 135 वा वर्धापनदिन राज्यात साजरा करण्यात येत आहे. पुण्यात देखील काँग्रेसचा (Congress) वर्धापनदिन (Anniversary) साजरा होत आहे. आजच्या या वर्धापनदिनाला भाजप (BJP) नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून सर्वांनाच सुखद धक्का दिला. भाजपचे खासदार गिरीष बापट (Girsh Bapat) यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह आज सकाळी थेट काँग्रेस भवन गाठले. त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा देताना गिरीष बापट म्हणाले, प्रेम नसले तर नसू द्या पण वैर नको, ही पुण्याची खरी संस्कृती आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. यावेळी गिरीष बापट यांच्यासोबत महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहाध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह भाजप नगरसेवक, कार्यकर्ते यांचा ताफा काँग्रेस भवनात शुभेच्छा देण्यासाठी आला होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी या सर्वांचे स्वागत केले. यानंतर हास्यविनोदाची मैफिल बापट आणि बागवे यांच्यात जमली. त्यांना बीडकर, मोहोळ व काँग्रेसकडून अविनाश बागवे, रमेश अय्यर, अजित दरेकर, रवींद्र माळवकर या मंडळींनी साथ दिली.

खासदार गिरीष बापट म्हणाले, पक्ष कार्यकर्ते पक्षासाठी काम करत असतात. ते करताना मतभेद होतच असतात. पण ते वैचारिक असावेत. पुण्यात हे नेहमी पाळले जाते. तीच पुण्याची संस्कृती आहे. वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलो तरी आपण एकमेकांच्या सुख दु:खात सहभागी होतो ते असेच कायम राहिले पाहिजे. दरम्यान, भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस भवनात जाऊन शुभेच्छा दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी देखील काँग्रेस भवनात जाऊन रमेश बागवे यांच्यासह कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.