अडीच लाखाची फसवणूक करणारा अटकेत

सांगली पोलीसनामा ऑनलाईन

शहरातील विजयनगर येथे एका चप्पल दुकानदाराने दोन कामगारांकडे विक्रीसाठी दिलेले अडीच लाख रूपयांचे चप्पल, सँडल, बूट घेऊन त्यांनी पोबारा केला. दि. 14 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. यातील एका कामगाराला गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दोन लाखांच्या मुद्देमालासह एक रिक्षा जप्त करून त्याला अटक केली. तर एक संशयित पसार झाला आहे.

बाळासाहेब मारूती देवकर (रा. मांगले, ता. शिराळा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर दुसरा संशयित पांडुरंग तोडकर (रा. मांगले) फरार झाला आहे. याबाबत दुकानदार चंद्रशेखर रविंद्र बिनवडे (वय 27) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , बिनवडे यांचे विजयनगर येथे चप्पल विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात देवकर आणि तोडकर कामगार म्हणून काम करत होते. त्यांनी बिनवडे यांचा विश्‍वास संपादन केला होता. त्यातून त्यांनी अन्यत्र विक्रीसाठी चप्पल, सँडल, बूट द्यावेत अशी मागणी बिनवडे यांच्याकडे केली. विक्री झाल्यानंतर पैसे परत देण्याची दोघांनीही कबुली दिली होती. त्यानंतर बिनवडे यांनी अडीच लाख रूपये किमतीचे विविध प्रकारचे चप्पल, सँडल, बूट या दोघांना दिले. साहित्य घेतल्यानंतर दोघेही निघून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी बिनवडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही. शिवाय त्यांचा शोधही घेतला मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने हालचाली करत बाळासाहेब देवकर याला मांगले परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून एका रिक्षामध्ये भरलेला दोन लाखांचा मुद्देमाल रिक्षासह ताब्यात घेण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील, राजू कदम, मारूती साळुंखे, संदीप पाटील, सचिन सूर्यवंशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.