बिबट्याची गोळ्या झाडून शिकार, दोघांना अटक

ADV
गोंदिया : पोलीसनामा ऑनालाईन – मादी जातीच्या बिबट्याची गोळ्या झाडून शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वनअधिकाऱ्यांनी दोघांना अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील केळवद शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी हेमराज मेश्राम आणि भीमसेन डोंगरवार या दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २७ डिसेंबरपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.

केळवद शिवारात ही घटना घडली असून गोठनगाव वनपरिक्षेत्रात बिबट्याचा मृतदेह काही दिवसांपूर्वी सापडला होता. दोन गोळ्या झाडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात बिबट्याला दोन गोळ्या घालण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं. तसेच शिकार केल्यानंतर पंजे आणि नखे कापून नेण्यात आले होते. बिबट्याच्या शिकाऱ्यां ना अटक करण्याचे मोठे आवाहन वन विभागासमोर होते. वनविभागातर्फे यादृष्टीने कसोशीने प्रयत्न करण्यात आले.

रविवार व सोमवारी दोन्ही दिवस वनविभागाच्या पिटर नामक श्वानाने नजीकच्या परिसर पिंजून काढला. मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही. मात्र वनविभागाने प्रयत्न सोडले नाही. सुरबन येथील हेमराज मेश्राम व भिमसेन डोंगरवार यांना वनविभागाने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली. यात आरोपीकडून एअरगन व लोखंडी काता हस्तगत करण्यात आल्याची माहिती प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांनी दिली.