बनावट कागदपत्राद्वारे दुचाकीची विक्री करणारी ‘दुकली’ जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – चोरलेल्या दुचाकीची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने काळेपडळ येथे सोमवारी (दि.२९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ९ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या २७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

शुभम विनोद भंडारे (वय-२५ रा. जुना औसा रोड, लातूर मुळ रा. परभणी), चेदन रविंद्र हिंगमिरे (वय-२६ रा. काळेपडळ, पुणे मुळ रा. तासगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर त्यांचे इतर दोन साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींनी ४० ते ४५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली असून त्यापैकी २७ दुचाकी जप्त केल्या आहेत. तर उर्वरीत दुचाकी लातूर, परभणी, नांदेड आणि मुखेड परिसरात विक्री केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

पुणे शहरातून दुचाकीची चोरी करून त्याचेवरील बनावट नंबर टाकून त्या नंबरचे आरटीओ बनावट कागदपत्र बनवून इतर शहरात दुचाकी विक्री करणारे काळेपडळ येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट ५ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार युनिट-५ च्या अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करून काळेपडळ परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शुभम आणि चेतन हे नंबर प्लेट नसलेल्या बुलेटवरून येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून गाडीची कागदपत्रे मागितली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने गाडीचा चेसीज नंबत तपासून पाहिला असता ही गाडी परभणी जिल्ह्यातील मोधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी ४० ते ४५ दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

गुन्हा करण्याची पद्धत

अटक करण्यात आलेले आरोपी आणि त्यांचे इतर दोन साथीदार दुचाकी चोरण्याचे काम करत होते. तर चेतन हिंगमीरे हा चोरलेल्या गाड्यांचे बनावट कागदपत्र बनवण्याचे काम करत होता. कागदपत्र तयार केल्यानंतर सर्वजण दुचाकीची विक्री करत होते. तसेच उधारीवर पैसे घेऊन पैसे परत देण्याच्या खात्रीकरीता वाहने संबंधित लोकांकडे गहाण ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, संतोष तासगावकर, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस हवालदार संतोष मोहिते, प्रदिप सुर्वे, अमजद पठाण, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, दत्ता काटम, राजाभाऊ भोरडे, संजय देशमुख, केरबा गलांडे, महेश साळवी, सचिन घोलप, प्रमोद गायकवाड, अंकुश जोगदंडे, महेश वाघमारे, दया शेगर, प्रविण काळभोर, प्रमोद घाडगे, संजयकुमार दळवी यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त