केअर टेकरला स्टंप, बॅटने जबर मारहाण ; बालसुधारगृहातून खुनाच्या गुन्ह्यातील ‘त्या’ २ बालकांचे पलायन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – विधीसंघर्षीत बालकांनी सुधारगृहातील केअरटेकरला लाकडी दांडा, बॅटने मारहाण करत पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे बालसुधारगृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आनंद भिमराव शिवदेव (वय ३५) हे जखमी झाले आहेत.

शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बालसुधारगृहात खुनाच्या गुन्ह्यात २ विधी संघर्षग्रस्त बालकांना ठेवण्यात आले होते. दरम्यान आनंद भिमराव शिवदेव (वय ३५) हे त्यांना जेवण देण्यासाठी गेले. त्यावेळी अगोदरच दोघांनी केलेल्या योजनेनुसार केअर टेकर आनंद शिवदेव यांच्याशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी सरळ लाकडी स्टंप, बॅटने बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यावर, पायावर मारहाण करत रक्तबंबाळ करुन जखमी केले. त्यानंतर दोघेही पळून गेले.

जखमी शिवदेव यांचेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. माहिती मिळाल्या नंतर पोलीसांनी घटनास्थळाची पहाणी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस. के. इंगळे करत आहे.